Showing posts with label इतिहास. Show all posts
Showing posts with label इतिहास. Show all posts

6 Mar 2014

मराठा साम्राज्याचा इतिहास

मराठा साम्राज्य इ.स. १६७४ ते इ.स. १८१८ पर्यंत भारतात अस्तित्त्वात असलेले हिंदू राज्य होते. याच्या परमोच्च बिंदूला या साम्राज्याने दक्षिण आशियाचा मोठा भूभाग व्यापला होता. हे साम्राज्य शिवाजी महाराजांनी इ.स. १६४५ मध्ये विजापूर राज्यातून पुण्याजवळील तोरणा किल्ला जिंकून स्थापन केले. शिवाजींनी त्यांच्या कालावधीत औरंगजेबाविरूद्ध गनिमी कावा वापरून केलेल्या लढायांमुळे मराठी साम्राज्याचा विस्तार प्रचंड वाढला. इ.स. १६८०मधील शिवाजींच्या मृत्यूनंतर काही काळ अस्थैर्य माजले जे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर संपले. यानंतर शिवाजींचे वंशज जरी राज्य करत असले तरी प्रधानमंत्री असलेल्या पेशव्यांच्या हातात राज्यकारभाराची सूत्रे गेली. पेशवे हे प्रभावी राज्यकर्ते होते आणि त्यांच्या कारकिर्दीत मराठी साम्राज्य अधिक विस्तार पावले शेवटी पानिपतच्या तिसर्‍या लढाईत अफगाण सैन्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. अखेरचा पेशवा दुसरा बाजीराव आंग्लांबरोबरील तिसर्‍या लढाईत पराभूत झाला.
गनिमी कावा, डोंगरांतून अभेद्य किल्ले बांधणे व त्यायोगे आसपासच्या मलुखावर वचक ठेवणे हा मराठा साम्राज्याचा सुरुवातीला पाया होता. या साम्राज्याला मोठी किनारपट्टी होती व कान्होजी आंग्रे व इतर दर्यासारंगांच्या मदतीने ही सीमा प्रभावीपणे सांभाळली. दक्षिण भारतातील इतर राज्ये व मराठा साम्राज्यातील हा एक मोठा फरक होता. मराठी आरमाराने पोर्तुगीझ व ब्रिटिश आरमारांना शह दिल्यामुळे त्यांचा उपयोग करून या परकीय सत्तांना किनाऱ्यांकडून शिरकाव करता आला नाही. कान्होजी आंग्रे यांनी भारतातील पहिले मोठे आरमार उभे केले व त्यामुळे त्यांना भारतीय आरमाराचे जनक म्हणले जाते.