31 Jan 2015

महाराष्ट्र ठरला पंतप्रधान बॅनरचा उपविजेता


नॅशनल कॅडेट कोर्प्सचा (एनसीसी) सर्वोच्च बहुमान असणाऱ्या पंतप्रधान बॅनरचे उपविजेतेपद यंदा महाराष्ट्राला मिळाले आहे. बुधवारी येथील कॅन्टोनमेंट भागातील डीजी एनसीसी परेड ग्राऊंडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंजाबला विजेतेपदाचा तर महाराष्ट्राला उपविजेतेपदाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


प्रजासत्ताक दिनानिमित्त 1 जानेवारी 2015 पासून एनसीसी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील 17 एनसीसी विभागातील 2070 कॅडेट्सनी यात सहभाग घेतला होता. या शिबिरात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमधे अव्वल क्रमांक पटकविणाऱ्या विभागाला पंतप्रधानांच्या हस्ते `पंतप्रधान बॅनर` या बहुमानाने सन्मानित करण्यात येते. आतापर्यंत पार पडलेल्या 23 एनसीसी शिबिरामधे महाराष्ट्राला सर्वात जास्त 17 वेळा हा बहुमान मिळाला आहे. बुधवारी महाराष्ट्राला हा बहुमान मिळाला असता तर गेल्या पाच वर्षांपासून सतत पंतप्रधान बॅनरचे विजेतेपद खिशात घालणाऱ्या महाराष्ट्राला आपले वर्चस्व कायम ठेवता आले असते.यावर्षीच्या प्रजासत्ताक दिन पथसंचलनात महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाच्या अमन जगताप या कॅडेटने देशभरातील 144 कॅडेटसचे नेतृत्व करून महाराष्ट्राला सलग दुसऱ्यांदा हा बहुमान मिळवून दिला. महाराष्ट्रातील 37 मुली आणि 76 मुलांसह एकूण 113 एनसीसी कॅडेटसनी या शिबिरात सहभाग नोंदविला होता. कर्नल शहाजी जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे उपप्रमुख मेजर आर.आर. शिंदे, कॅप्टन सुजाता थोरात यांचा महाराष्ट्राच्या एनसीसी पथकात समावेश होता.स्त्रोत:- माहिती संचालनालय.

No comments:

Post a Comment