4 Feb 2014

क्लाऊड तंत्रज्ञान सुविधा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्र राज्य अग्रेसर असून शासन स्तरावरील क्लाऊड तंत्रज्ञान सुविधा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. क्लाऊडचा उपयोग करुन शासनातील विविध विभाग जलदगतीने आणि कमी खर्चात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध ॲप्लिकेशन वापरु शकतात. देशातील कुठल्याही राज्याने अथवा विभागाने क्लाऊड संदर्भात मदत मागितल्यास ते देण्यास माहिती तंत्रज्ञान विभाग सहकार्य करेल, असे माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले. 

माहिती तंत्रज्ञान विभागाच्यावतीने महागो क्लाऊड ॲण्ड IPS6 इनॅब्लिमेंट या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा, हॉटेल इंटर कॉन्टीनेन्टल येथे सोमवारी आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना श्री.अग्रवाल बोलत होते. यावेळी माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक विरेंद्र सिंग आणि देशभरातील विविध राज्याचे तसेच राज्याच्या विविध विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा अधिक क्षमतेने आणि गतिमानतेने उपयोग करण्यासाठी क्लाऊडचा उपयोग करणे आवश्यक आहे. महागो क्लाऊडच्या विविध वापरासाठी दरपत्रक तयार केले असून त्याचा वापर पारदर्शकपणे करणे शक्य होणार असल्याचेही श्री.अग्रवाल यांनी सांगितले. 

माहिती तंत्रज्ञान सल्लागार लक्ष्मीकांत त्रिपाठी यांनी या कार्यशाळेत महा क्लाऊडचे तर धर्मेंद्र राय यांनी IPS6 इन महाराष्ट्र या विषयावर सादरीकरण केले. सीडॅकच्या प्रतिनिधीने मेघदूत क्लाऊड, मायक्रोसॉफ्टच्या प्रतिनिधीने मायक्रोसॉफ्ट क्लाऊड या विषयावर आपले सादरीकरण केले.

No comments:

Post a Comment